९. नाटक ( विनोदी )

घडी घडीच्या कथा

आज सानियाचा  पारा काही वेगळाच चढला होता. चार दिवसाच्या टूर वरून आल्यावर दिवसभर सोहमचे सानिया सोबत काहीच बोलणे झाले नव्हते आणि तितकेच निमित्त होते. त्यामुळे कायम बडबडणारी व्यक्ती काहीच बोलत नव्हती. ही भयाण शांतता कशी मोडायची या विचारात सोहम किचन मध्ये गेला. त्यावर उपाय म्हणून सोहमने चहा केला आणि कवितेचा घाट घातला. सोहम काव्य रसिक, त्यामुळे ते त्याच्या हातातील दुधारी शस्त्र म्हणून तो बऱ्याच वेळी हमखास ते वापरायचा. हातात दोन चहाचे कप घेऊन तो बाहेर आला. तिच्या समोरच्या टेबलावर ते ठेवले. फोन मध्ये काही तरी पाहिल्यासारखे केले आणि बोलू लागला.

सोहम :

रुसलीस तू, चूक माझी कळेना
हरवलेल्या चेहऱ्यावरचे हसू पुन्हा मिळेना

काही वेळ दूर गेलो काय आता मात्र जुळेना
नाकावरच्या रागाचे औषध काही मिळेना

( सोहम उठून उभा राहिला. सानियाच्या जवळ गेला. तिच्या हातात पुस्तक होते. ते पाठून जाऊन ते घेतलं )

सोहम : 

रुसणार तू समजवणार मी वाद काही मिटेना 
रुसवा तुझा घालवू कसा कोडे काही सुटेना

( सानिया पुन्हा उठून लांब गेली. तो ही तिच्या मागे...)

सोहम :

ऋतू बदलले तरीही खुलता कळी ही खुलेना 
दे सोडून राग तुझा आता पूरे झालेना

माझं सांगण बोलणं तुला काही पटेना 
आपल्या मधील शीत युद्ध काही केला मिटेना

सानिया : 

फार काही नव्हते थोडे माझे ही ऐकायचे ना
जगभरातील बातम्या मला ही कधी सांगायचे ना 

तेव्हा मात्र तुझा असतो कुठला तरी बहाणा
सतत फोन news चॅनल इतकाच तुझा कुटाना 

सोहम : 

झाले गेले सारे विसरून तूच समजून घे ना 
चूक झाली असेल माझी आता तरी बोलना

मोरल ऑफ द स्टोरी
रुसवा तुझा जिवघेणा आता तरी सोडना


( तिने सोहमकडे पाहिले. त्याच्या हातातला कप घेतला पुन्हा टेबलावर ठेवला.)

सानिया : 

रेडिओ, टी व्ही, फोनची बॅटरी सगळं तुच आहेस ना
चार दिवसांनी भेटल्यावर ही लक्ष तुझे तिकडे जाईना 

आता गरम चहा घेऊन तुला कविता जशी सुचते ना
कवितेतून अबोला घालवण्या तुला बरे जमते ना

( तिच्याकडे पाहत त्याने दुसरा कप उचलला आणि म्हणू लागला)

सोहम : चहा घेना plzzz...

काठोकाठ कपात तरंगणारी साय
आनंद म्हणजे काय ...
फक्त एक कप चाय...

बोलायला सुरुवात, साखरेची बरसात
रुसवा घालवायला अजून लागतं तरी काय
आनंद म्हणजे काय ...
फक्त एक कप चाय ...

वाफेवर चहाच्या, आठवणी जगायच्या
चेहऱ्यावर तुझ्या आनंद तेव्हा मी  पाहिलाय
आनंद म्हणजे काय ...
फक्त एक कप चाय ...

सानिया  : 

माझे बोलणे, तुझे ऐकणे
चूक झाली की गुरगुरणे
Sorry आणि विनवणी
बाकी मागे उरते काय


सोहम : फक्त एक कप चाय...

( सानियाने टेबलावरचा चहा घेतला. सोहम तिच्या जवळ गेला आणि म्हणू लागला)

आलो बघ ऐकायला
मनातलं सांगायला
चार दिवसाचा राहिलेला
कोटा सगळा भरायला
आनंद म्हणजे काय ... तुझ्या हातचा चाय 

सानिया : 
चहा झाला गार
त्यात साखरच फार
गोड गोड साखरेला
तिखटाची धार
आनंद म्हणजे काय ... कविता आणि चाय


सोहम : वाह ( तिच्याकडे पाहत म्हणला ) ... कविता आणि चाय....

रुसलेली सानिया आणि सुचलेली कविता चहा वर येऊन हसली आणि एक घडीची कथा पूर्ण झाली. आणि दुसरी सुरू ...
 
- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

ठिणगी

शिंपले

११. पर्वत म्हणतो अभिमानाने