९. नाटक ( विनोदी )
घडी घडीच्या कथा आज सानियाचा पारा काही वेगळाच चढला होता. चार दिवसाच्या टूर वरून आल्यावर दिवसभर सोहमचे सानिया सोबत काहीच बोलणे झाले नव्हते आणि तितकेच निमित्त होते. त्यामुळे कायम बडबडणारी व्यक्ती काहीच बोलत नव्हती. ही भयाण शांतता कशी मोडायची या विचारात सोहम किचन मध्ये गेला. त्यावर उपाय म्हणून सोहमने चहा केला आणि कवितेचा घाट घातला. सोहम काव्य रसिक, त्यामुळे ते त्याच्या हातातील दुधारी शस्त्र म्हणून तो बऱ्याच वेळी हमखास ते वापरायचा. हातात दोन चहाचे कप घेऊन तो बाहेर आला. तिच्या समोरच्या टेबलावर ते ठेवले. फोन मध्ये काही तरी पाहिल्यासारखे केले आणि बोलू लागला. सोहम : रुसलीस तू, चूक माझी कळेना हरवलेल्या चेहऱ्यावरचे हसू पुन्हा मिळेना काही वेळ दूर गेलो काय आता मात्र जुळेना नाकावरच्या रागाचे औषध काही मिळेना ( सोहम उठून उभा राहिला. सानियाच्या जवळ गेला. तिच्या हातात पुस्तक होते. ते पाठून जाऊन ते घेतलं ) सोहम : रुसणार तू समजवणार मी वाद काही मिटेना रुसवा तुझा घालवू कसा कोडे काही सुटेना ( सानिया पुन्हा उठून लांब गेली. तो ही तिच्या मागे...) सोहम : ऋतू बदलले तरीही खुलता कळी ही खुलेना ...