शिंपले
तो मुलगा धावत मागे आला आणि तिला विचारले " तूला काही हवे का यातले ? " तिच्या निरागस डोळ्यांनी एका ठिकाणी नजर रोखली आणि सुंदर बाहुलीकडे बोट दाखवले. आपल्या बहिणीचा हात पकडून तो तिला दुकानात घेऊन आला. त्याने ती बाहुली उचलून तिच्या हातात दिली. ती बाहुली हातात आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो मनोमन खुश झाला.
दुकानदार गल्ल्यावर बसून हे सारे पाहत होता. तो मुलगा तिला घेऊन दुकानदाराजवळ आला. सहा वर्षाच्या त्या मुलाचे आपल्या बहिणीसाठी भरून आलेले काळीज बघून दुकानदाराला गहिवरून आले. मुलाने दुकानदाराला विचारले " या बाहुलीची किंमत काय आहे ? "
त्यावर तो म्हणला " बाळा, तू सांग ... तू काय देऊ शकशील ? " तेव्हा त्या मुलाने खिशात हात घातला आणि खिशातून शिंपले काढले. थोड्या वेळापूर्वी त्या दोघांनी समुद्र किनाऱ्यावरून ते गोळा करून आणले होते. ते सगळे शिंपले त्याने दुकान दारासमोर ठेवले. दुकानदार ते पैशाप्रमाणे मोजु लागला. त्या मुलाने विचारले " कमी आहे का ? " त्यावर तो दुकानदार म्हणला " नाही नाही , उलट जास्त आहेत. "
त्यातले चार शिंपले स्वतः जवळ ठेवून बाकीचे त्याने मुलाला परत केले. मुलाने आनंदाने ते शिंपले आपल्या खिशात परत टाकले आणि आपल्या बहिणीचा हात पकडून तो तिथून निघून गेला. हे सगळे दुकानातला कामगार बघत होता. त्याने विचारले " एवढी महाग बाहुली तुम्ही फक्त चार शिंपल्याच्या बदल्यात देऊन टाकली ! "
दुकानदाराने एक स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून त्याला म्हणले " आपल्यासाठी हे फक्त शिंपले असले तरी त्यांच्यासाठी ते मौल्यवान होते. त्या वयात त्यांना पैशाची किंमत कळणार नाही. पण जेव्हा ते मोठे होतील, त्यांना लक्षात येईल की आपण शिंपल्याच्या बदल्यात एक सुंदर बाहुली घेतलेली. तेव्हा त्यांना माझी आठवण येईल. आणि तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव होईल की हे विश्व चांगल्या माणसांनी सुद्धा भरलेले आहे. त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होईल आणि तो मुलगा त्याची बहीण सुद्धा चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करतील.
जे आपल्याला मिळते त्याला कधी कधी पर्याय नसतो, त्यामुळे त्यात समाधानी राहून आनंदी राहायला हवे. शेवटी असे म्हणले आहे की ते हात कायम पवित्र असतात जे प्रार्थनेसाठी जोडले जातात पण त्यापेक्षा जास्त सेवा करण्यासाठी पुढे येणारे हात अधिक पूजनीय असतात.
“कर्म करे सो करे ना कोई ,कर्म बड़ो बलवान।
कर्म करे कंकाल पलक में ,कर्म करे धनवान।।”
(दोहा संग्रह )
Comments
Post a Comment