ठिणगी
काही दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचायला आणले. लेखक “ चेतन भगत “ पुस्तकाचे नाव “ what young india wants “ या इंग्रजी पुस्तकात लेखकाच्या एकंदर जीवनात घडलेले अनुभव आणि त्यावर त्याने लिहिलेले काही अनुमान आहेत. यावर लिहिताना बऱ्याच ठिकाणी मला त्यातील काही अनुभव समोर पाहिले, घेतले आहे असे वाटले. कदाचित वाचताना तुम्हाला ही तसे वाटू शकते. साधारण अठरा ते पंचवीस या वयात असताना मला किंवा तुमच्यातील कित्येकांना ही माझी गोष्ट आहे असे वाटू शकते. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या या घटनांतून कसे तरून जावे याचे थोडक्यात उत्तर या प्रकरणात समजले. त्यातील हे एक प्रकरण ठिणगी...चेतन भगत यांच्या दृष्टीने ठिणगी हे लिहिलेले प्रकरण...
“ I come from a land of billion spark, isn’t that cool “
मी ज्या जागेवरून आलो. तिथे असंख्य ठिणग्या आहेत. खरंच भारी आहे ना !
सगळ्यांना सुप्रभात आणि मला तुमच्यासोबत बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हा दिवस तुमचा आहे. हो... तुम्हीच... स्वतःचा (कम्फर्ट किंवा डिसकम्फर्ट ) परीघ सोडून काही तरी बनण्यासाठी या कॉलेजमध्ये तुम्ही आलेले आहात. माणसाच्या आयुष्यात असे काही दिवस येतात, जेव्हा तो खूप आनंदी असतो. कॉलेजचा पहिला दिवस हा त्यातलाच एक दिवस. जेव्हा तुम्ही छान तयार होऊन येता. कधी पोटात गोळा आलेला असतो. तिथले सभागृह कसे असेल ? तिथले शिक्षक कसे असतील ? नवे मित्र कोण असतील ? अशा बऱ्याच गोष्टींची उत्कंठा लागलेली असते. मी त्या उत्कंठेला तुमच्यातील “ स्पार्क “ किंवा “ ठिणगी “ म्हणतो. जी तुम्हाला खरोखर जिवंत ठेवते. आज मी बोलणार आहे या ठिणगीला कसे ज्वलंत ठेवता येईल यावर. आपण आनंदी राहू शकतो, नेहमीच नाही निदान जास्तीत जास्त प्रसंगात तरी तसे प्रयत्न करू शकतो.
ही ठिणगी नक्की सुरवातीला कुठे पेटते ? मला वाटते आपण ती सोबत घेऊनच जन्माला येतो. माझी दोन जुळी मुले, त्यांच्यातही असंख्य ठिणग्या आहेत. छोटे स्पायडरमॅन कधी बेडवरून उड्या मारतात. बागेत इकडून तिकडे बागडताना त्यांना ( थ्रील ) रोमांचक वाटते. बाबांकडून गोष्ट ऐकताना ही त्यांची उत्कंठा वाढते. येणाऱ्या वाढदिवसासाठी आधीच त्याचे काउंटडाउन सुरू असते. अगदी बऱ्याच महिन्या आधी. फक्त त्या दिवसासाठी जेव्हा ते त्यांच्या वाढदिवसाचा केक कापणार असतात.
मी तुमच्यासारख्या मुलांना पाहतो. तेव्हा मला ती ठिणगी दिसते. पण जेव्हा मी वयोवृद्ध लोकांना पाहतो. ती ठिणगी शोधणे कठीण जाते. म्हणजेच वयासोबत ही ठिणगी विझत जाते. ज्या लोकांमध्ये ही ठिणगी विझत असते ते खूपदा मंद, दुसऱ्याने नाकारलेले, ध्येय नसलेले आणि कडवट वाटतात. जब व्ही मेट मधल्या करिनाला पहा. चित्रपटाच्या आधीच्या भागात आणि नंतरच्या भागात हा फरक दाखवला आहे. तेव्हा ही ठिणगी विझत असते. आता ही ठिणगी जिवंत कशी ठेवायची ?
एका दिव्याला पेटवणारी ही ठिणगी आहे अशी कल्पना करा. सगळ्यात आधी त्याचे पोषण ( नर्चर ) होणे म्हणजेच त्याला ऊर्जा देणे गरजेचे आहे आणि दुसरे असे की येणाऱ्या वादळापासून त्याचे संरक्षण करणे.
पोषण करण्यासाठी आपल्याकडे एक ध्येय असावे. आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे, सुधारणे आणि मिळवणे हा मानवी गुणधर्म आहे आणि तेच आपले यश आहे. तुम्हाला ते करणे शक्य आहे. त्यासाठी कोणतेही बाह्य मापक ( मेजर ) नाहीत. त्याचा मोबदला म्हणजे काहीतरी किंमत जी कंपनीला तुम्हाला द्यावी लागते. एखादी मोटार कार किंवा एखादे घर.
साधारणपणे आपण मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेलो असतो. आपल्याकडे ( मटेरियलिस्ट ) भौतिक सुख असणारे चित्र यशाच्या रुपात पाहिले जाते. ते बरोबर ही आहे. जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जन्म घेता जिथे पैशाची कमतरता तुमच्या आवडी निवडी ठरवते. तिथे आर्थिक स्वातंत्र्य ही एक मोठी ( अचिव्हमेंट ) कामगिरी मानली जाते. पण त्यात तुमच्या जगण्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जर तशीच स्थिती असती तर अंबानी सातत्याने त्यांच्या कामासाठी गेले नसते. शाह रुक खान घरी आरामात राहिला असता. पुन्हा सिनेमात दिसला नसता. स्ट्रीव्ह जॉबची आयफोन बनवण्यासाठी इतकी धडपड झाली नसती. जेव्हा त्याच्याकडे आधीच पिक्सर सारखी बिलीयन डॉलरची गोष्ट सोबत होती. ते कशासाठी करतात ? काय आहे जे त्यांना रोज काम करायला येण्यासाठी प्रवृत्त करते ? ते हे सगळे करतात कारण त्यांना त्यातून आनंद मिळतो. ते करतात कारण त्यातून ते जिवंत असल्याचे त्यांना जाणवते. आताच्या पातळी वरून आणखी सुधारणे यात त्यांना आनंद मिळतो. जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा रँक वाढेल. तुम्ही इतरांशी संवाद केला तर तुमची मुलाखत चांगली जाईल. तुम्ही प्रयत्न केलेत तर तुम्हाला क्रिकेट चांगले खेळता येईल. तुम्ही तेंडुलकर होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही नक्कीच पुढच्या पातळीवर जाल आणि पुढच्या पातळीवर जाणे हेच महत्वाचे.
निसर्गाने वेगवेगळे जिन्स आणि परिस्थितीची सर मिसळ करून आपल्याला जन्माला घातले आहे. त्यासाठी आपण खुश राहून या गोष्टी स्वीकारायला हव्यात. निसर्गाने बनवलेल्या या कलाकृतीतून अधिक निर्माण करायला हवे ? तुम्ही हे करताय का ? तुमचे ध्येय तुम्हाला त्यासाठी मदत करेल. यात मी नक्कीच एक सांगेन फक्त करियर आणि शैक्षणिक ध्येय ठेवू नका. असे ध्येय निश्चित करा जे तुम्हाला (बॅलन्स) संतुलित आणि यशस्वी असे आयुष्य देईल. संतुलित हा शब्द मी यासाठी यशस्वीच्या आधी लिहिला. संतुलित म्हणजे आरोग्यासाठी, नातेसंबंध, मानसिक स्वास्थ्य हे सगळेच एका ओळीत सांभाळायला हवे.
तुमचा प्रेमभंग झाला त्याच दिवशी तुम्हाला नोकरीत बढती मिळाली तर त्याला काय अर्थ आहे? तुमची पाठ दुखत असेल तेव्हा तुम्ही गाडी चालवायची मजा कशी घेणार ? जेव्हा तुमच्या मनावर खूप ताण तणाव आहे तेव्हा खरेदीचा उत्साह असेल का ?
तुम्ही हे वाक्य वाचले आहे ... आयुष्य ही एक कठीण शर्यत आहे. मॅरेथॉन किंवा असे काही... नाही... जे मी आज वर पाहिले. आयुष्य ही अशी शर्यत आहे. जी तुम्ही नर्सरीत असताना खेळली आहे. ज्यात तुम्हाला तोंडात चमचा ठेवून आणि त्या चमच्यात दगड घेऊन तुम्हाला धावायचे असते. जर तो दगड खाली पडला तर शर्यतीत पहिला येण्याला काहीच अर्थ नसतो. आपल्या आयुष्यात ही तसेच असते. जिथे आरोग्य आणि नातेसंबंध हे ते दगड असतात. तुमचे जिंकणे तेव्हाच परिपूर्ण होते जेव्हा आयुष्यात ही ( हार्मनी ) सुसंगती असेल. नाही तर तुम्हाला यश मिळेल पण ती ठिणगी, ती भावना आणि उत्सुकता हळूहळू नामशेष व्हायला सुरुवात होईल.
आणखी एक अशी गोष्ट या ठिणगीला ऊर्जा देण्यासाठी आहे ते म्हणजे “ आयुष्याला गांभीर्याने घेऊ नका. “ आमचे योगाचे शिक्षक मुलांना खूप हसायला लावायचे. एका विद्यार्थ्याने त्यांना म्हणले “ यातून काही तरी मिळते.” योगाचे ते शिक्षक म्हणाले “ गांभीर्याने घेऊ नका, पण प्रामाणिक राहा. “ हा एक विचार माझ्या आजवरच्या कामाला परिपूर्ण करतो मग ते माझे लिखाण असो, माझी नोकरी किंवा माझे नाते संबंध किंवा माझे ध्येय. मला माझ्या लिखाणावर हजारोंनी प्रतिक्रिया येतात. कधी कौतुकाचे सर्वोच्च टोक येते. तर कधी तशीच टोकदार टीका. जर मी हे सगळे गांभीर्याने घ्यायला लागलो तर मी कसा लिहिणार ? कसा राहू शकणार ? आयुष्य हे गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाहीच, कारण आपण इथे तात्काळ राहणार आहोत. आपण खरं तर प्री पेड कार्ड सारखे आहोत ज्याची व्हॅलिडिटी ठरलेली आहे आणि पन्नास वर्षे म्हणजे फक्त २५०० आठवडे. खरंच आपल्याला इतके कामात व्यस्त होणे गरजेचे आहे का ? काहीच हरकत नाही ... काही क्लास बंक केले तर, काही मुलाखती चुकवल्या तर, प्रेमात पडलो तर ... काहीच हरकत नाही. आपण माणूस आहोत. पूर्व नियोजित यंत्र नाही.
मी तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या, ( रिझनेबल गोल ) तर्कसंगत ध्येय ,( बॅलन्स )संतुलन आणि आयुष्याला गांभीर्याने घेऊ नका. या गोष्टी तुमच्यातील ठिणगीला पोषण देत राहतील. त्यात ही चौथे वादळ तुमच्या आयुष्याला अशी काही कलाटणी देईल संभाव्य धोका मिळेल. तुमच्या ध्येयापासून तुम्ही पूर्णपणे दूर निघून जाल. तेव्हा मात्र त्यापासून स्वतःला वाचवायचे. खूपदा निराशा, राग, दुय्यम वागणूक, एकटेपणा तुमच्या जगण्याचा अर्थ हिरावून घेतो.
निराशा तेव्हा येते जेव्हा सगळी मेहनत करून ही हवे तसे परतावे मिळत नाहीत. जेव्हा तुम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत नाही किंवा तुम्हाला माघार घ्यावी लागते. अपयश स्वीकारणे हे खरंच कठीण काम आहे. पण जे त्यातून पुढे येतात. ते धाडस घेऊन येतात. “ यातून मी काय शिकलो ? “ हे तुम्हाला स्वतःला विचारायची गरज असते. तुम्हाला स्वतःची लाज वाटेल. तुम्हाला तिथे थांबावे वाटेल. जसे की मला वाटलेले जेव्हा माझ्या पहिल्या पुस्तकासाठी नऊ प्रकाशकांनी नकार दिला. काही आयआयटीयन्स नी कमी श्रेणीमुळे स्वतःला संपवले. किती निरर्थक लाजिरवाणी गोष्ट आहे ही ? पण असेच आपल्या आयुष्यात येणारे काही नकार आपल्याला दुखावतात. पण हे आयुष्य आहे. जर आव्हाने प्रत्येक वेळी सर करता आली तर ती आव्हाने राहणार नाहीत. लक्षात ठेवा, जर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला हार पत्करावी लागत असेल म्हणजेच तुम्ही त्यासाठी तुमच्या पातळीवर मेहनत घेतली आहे. आणि हीच ती जागा आहे जिथपर्यन्त पोहोचायचे आहे.
निराशेचा दुसरा भाग म्हणजे (फर्स्ट्रेशन) राग . दुसरे वादळ. तुम्ही कधी खूप चिडले आहात का ? हे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी अडकून पडता. भारतात हे अगदीच सामान्यतः पाहायला मिळते. ट्रॅफिक जॅम पासून ते तुमच्या योग्यतेची नोकरी मिळेपर्यंत. कधी कधी गोष्टी घडायला खूप वेळ लागतो. तुम्हाला माहिती नसते. तुम्ही निवडलेले ध्येय बरोबर आहे की नाही.
पुस्तकानंतर मी माझे ध्येय बॉलीवूडसाठी लिहिण्याचे ठेवले होते. तिथे त्यांना लेखकांची गरज असेल असे मला वाटले. मी स्वतःला खूप नशीबवान समजले. पण ती गोष्ट सगळ्यांसमोर येण्यासाठी पाच वर्षे लागली. राग उत्सुकता शोषून घेतो आणि तुमची सुरवातीची ऊर्जा नकारात्मकतेकडे जाऊ लागते. तुम्हाला एक कडवट व्यक्तिमत्व करते. मी या गोष्टीना कसे हाताळले ? त्यावेळचा निष्कर्ष असा होता की चित्रपट तयार व्हायला बराच काळ जातो. जरी तो लगेच पाहून संपला तरी. या संपूर्ण प्रक्रियेत आनंदी राहणे गरजेचे असते. तो आनंद फक्त शेवटच्या निकलाचा नसतो. कमीत कमी मला स्क्रिप्ट कसे लिहायचे हे शिकता आले. सोबत माझ्या तिसऱ्या पुस्तकाचे लिखाणाचे नियोजन होते. हा काळ घालवण्यासाठी तुमच्या सोबत तुमचे मित्र, जेवण, प्रवास या गोष्टी असतात. लक्षात ठेवा काहीही गांभीर्याने घ्यायचे नाही. राग येणे ही खर तर त्याचीच खूण आहे की तुम्ही काही तरी खूप गांभीर्याने घेतले आहे.
दुय्यम वागणूक ही त्यातली आणखी एक स्वीकारण्यासाठी कठीण गोष्ट. पण दुर्दैवाने अशा प्रकारे देशात काम चालते. ज्यांचे चांगले संपर्क असतात, श्रीमंत पालक, सुंदर चेहरा, पिढीजात आलेले सुख, अशांना सहज काही मिळून जाते. बॉलिवूड नव्हे तर सगळीकडेच आणि कधी कधी नशिबाने. भारतात अशा अगदी कमी संधी येतात. तुमच्या यशासाठी हे असे बरेच तारे एका रेषेत यावे लागतात. मेरिट आणि मेहनत प्रत्येक वेळी यशासाठी पुरेसे पडत नाही. पण मिळवणे आणि टिकवणे यात बरेच अंतर असते हे नक्की. शेवटी गोष्टी नक्की घडून येतात. पण एक लक्षात ठेवा, काही लोक यात ही आपल्याला नशीबवान समजतात ज्यांना कॉलेजला जायची संधी मिळते. इंग्रजीत केलेले भाषण ते समजू शकतात. तुम्हाला ही असे वाटत असेल तर भारतीय निकषाप्रमाणे तुम्ही ही नशीबवान आहात. आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी असावे. जे नाही त्याचा स्वीकार करण्याची ताकद मिळवावी.
मला माझ्या वाचकांकडून जे मिळाले त्याची काही लेखकांनी कल्पना ही केली नसेल. मला लेखनासाठी कोणते पुरस्कार मिळाले नाही तरी चालेल. मी ऐश्वर्या राय सारखा दिसू शकत नाही पण माझी दोन मुले आहेत जे समजतात मी तिच्यापेक्षा ही सुंदर आहे. चालेल. मिळालेली दुय्यम वागणूक यामुळे तुमच्यातील ठिणगी विझू देऊ नका.
सगळ्यात शेवटी अशी गोष्ट जी त्या ठिणगीला मारक ठरू शकते ती म्हणजे एकटेपणा ( आयसोलेशन ) जसे तुमचे वय वाढत जाते. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. जेव्हा तुम्ही लहान असता सगळ्याच लहान मुलांना आईस्क्रीम आणि स्पायडरमॅन हवा असतो. जसे तुम्ही मोठे होता तेव्हा कॉलेजमध्ये ही तुम्ही बरेचसे तुमच्या मित्र परिवारात असता. पण दहा वर्षानी तुम्ही स्वतःला वेगळे समजायला लागता. तुम्हाला काय हवे आहे ? कशावर विश्वास आहे ? कोणत्या वेळी तुम्ही भावनिक होता ? कदाचित हे सगळं तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीपेक्षा वेगळे असू शकते. दोलायमान स्थितीत तुमचे ध्येय इतरांच्या स्वप्नाशी सतत तुलना करत असते आणि त्यामुळे तुम्ही अनेकांना तुमच्या आयुष्यातून वगळून टाकता. उदाहरणार्थ बास्केटबॉलचे कॅप्टन बास्केटबॉल खेळणे बंद करतात. त्यांचं दुसरं मुलं होईपर्यंत ते माघार घेतात. दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची होते. ते त्यांच्या कुटुंबासाठी हे करतात. पण ते करताना त्यांच्यातील ठिणगी विझून जाते. कधी ही अशी तडजोड करू नका. स्वतःवर प्रेम करा नंतर इतरांवर.
आता तुम्ही पहा, मी तुम्हाला ती चार वादळे – निराशा, राग, दुय्यम वागणूक, एकाकीपणा याबद्दल सांगितले. तुम्ही त्यांना काढून टाकू शकत नाही. जसे पावसाळे ( मान्सून ) ते तुमच्या आयुष्यात येतच राहणार.
कालांतराने तुम्ही फक्त इतकं करू शकता. तेव्हा तुमचा रेनकोट हाताशी ठेवा. जेणे करून ती ठिणगी विझणार नाही. मी तुम्हा सगळ्यांचे नवीन येणाऱ्या वर्षात स्वागत करतो. जर पुन्हा माझ्या आयुष्यातील काही क्षण अनुभवण्याची मला कोणी संधी दिली तर मागे जाऊन मी नक्कीच माझे महाविद्यालयीन जीवन निवडेन. मी इथे अशी अपेक्षा करतो की दहा वर्षांनी सुद्धा तुमची दृष्टी अशीच उजळू दे. ते तुमच्यातील ठिणगी जिवंत ठेवणार आहे. फक्त या कॉलेजच्या दिवसासाठी नाही तर पुढे येणाऱ्या २५०० आठवड्यासाठी. आणि फक्त तुम्हीच नाही तर आपला संपूर्ण देश ही ठिणगी जिवंत ठेवेल. इतिहासाच्या घटनापेक्षा ती आपल्याला जास्त गरजेची आहे. मी अशा जागेवरून आलो जिथे असंख्य ठिणग्या आहेत.
खूप, खूप सुंदर लेख लिहिलाय...❣️❣️❣️
ReplyDeleteThanks
Deleteखूप सुंदर लिहिलंय ताई...अप्रतिम❣️🔥💯
ReplyDeleteधन्यवाद 🩷
Delete